Ad will apear here
Next
फिरुनी नवी जन्मेन मी...


वैविध्यपूर्ण गाणी गाणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा आठ सप्टेंबर हा जन्मदिवस नुकताच होऊन गेला. त्या निमित्ताने, ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज पाहू या ‘फिरुनी नवी जन्मेन मी’ ही सुधीर मोघे यांची सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली आणि आशाताईंच्या स्वरांनी सजलेली कविता ...
............
अवघा सप्टेंबर सप्तसुरांनी सजलेला असतो. सुरुवात होते आशाताईंच्या मंतरलेल्या सुरांनी. हो! खरंच मंतरलेले सूरच ते. आठ सप्टेंबर उजाडण्याचीसुद्धा कुणी वाट पहात नाही. एक सप्टेंबरपासूनच आशाताईंच्या स्वरांच्या रेशीमलड्या रसिकांच्या मनात उलगडत राहतात! आणि गंमत म्हणजे आठ सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस साजरा झाला, तरी अनेक रेडिओ आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून आशाताईंच्याच गाण्यांच्या गप्पा सुरू राहतात... पावसाची रिमझिम थांबलेली असते; पण आशाताईंचं गाणं रसिकमनाच्या आभाळात रिमझिमत असतं. मधुबालाचं मोहक हास्य आणि नेत्रपल्लवी पाहावी, की आशाताईंच्या मादक, मधाळ स्वरातलं ‘आईये मेहरबाँ’ हे गीत ऐकावं... प्रत्येकवेळी नवी वाटावीत, टवटवीत टपोऱ्या गुलाबपुष्पासारखी वाटावीत, अशी आशाताईंची अनेक गाणी कानावर पडत होती; पण एक गाणं मात्र सारखं श्रृती-स्मृतींना जागवत होतं, ते म्हणजे सुधीर मोघे यांनी लिहिलेलं, बाबुजींनी स्वरबद्ध केलेलं आणि आशाताईंनी गायलेलं.... ‘एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी...’

खरं सांगते, हे गाणं, ना आशाताईंचं, ना सुधीर मोघे यांचं, ते झालं प्रत्येक संवेदनशील हळव्या रसिकमनाचं... कवीच्या शब्दांना, आशाताईंच्या स्वरांना, बाबुजींच्या अजरामर स्वररचनेला आणि भान हरपून ऐकणाऱ्या रसिकांनाही जणू काही आपणच नव्यानं जन्माला आलो आहोत, असं वाटत राहतं.

वाढदिवस म्हणजे तरी काय हो... आयुष्यातल्या नव्या क्षणांना अगदी नवंकोरं होऊन सामोरं जाणं... आणि त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणायचं, तर नव्यानं फिरून जन्माला येणं... प्रत्येक दिवस, सूर्यकिरणांचं तेज आणि उमलत्या कळ्यांचा गंध लेवून येतो ना अगदी तसंच वाटतं.  
सप्टेंबर हा असा शब्दस्वरांनी सजवणाऱ्या अनेक दिग्गजांचा! अनेक नावं डोळ्यापुढं येतायत; पण ‘एकाच या जन्मी जणू’ हे आशाताईंच्या गळ्यातून लाजवाब रीतीनं उतरलेलं गाणं पुन्हा पुन्हा आकृष्ट करतंय. नव्यानं पुन्हा जन्म घेण्यातली मजा किती मोहक छटांनी कवीनं, संगीतकारानं, वादक कलाकारांनी आणि आशाताईंच्या स्वरांनी व्यक्त केलीय. खरंच एखादं गाणं फक्त अनुभवायचं असतं, शब्दांमध्ये तो अनुभव मांडता नाही येत. कवी सुधीर मोघे कविता छापायला नको म्हणत. कारण ते एखाद्या पक्ष्याला कोंडण्यासारखं आहे असं त्यांना वाटे.

कुठून कुठून येतात पक्षी
आणि आभाळ भरून जातं
सोनेरी नादांची भरजरी नक्षी
आभाळ दिमाखात मिरवत राहतं...

मनाचं आभाळ भरून टाकणारा ‘पक्ष्यांचे ठसे’ हा कवितासंग्रह सुधीर मोघे यांनी लोकप्रिय लेखक व. पु. काळे यांच्या हट्टापायी पुस्तकरूपाने प्रकाशित केला. संगीतकार आणि कवी या दोन्ही रूपांतून सुधीर मोघे रसिकप्रिय झाले. 

‘एकाच या जन्मी जणू’ हे गीत नाही का आपल्याच मनाची अवस्था उलगडणारं आहे, असं संवेदनशील मनाला वाटतं. हो, संवेदनशील मनालाच. कारण संवेदनशून्यतेनं जगरहाटीकडे बघणारे अनेक जण असतात. त्यांना या कविता किंवा शब्दांचे खेळ म्हणजे भंपकपणा वाटतो. आयुष्यातला कडवटपणा, विफलता सतत त्यांच्या वाक्ताडनातून बाहेर येत असते. वैफल्याला स्वत:च कारणीभूत असून, त्याचं खापर दुसऱ्यांवर फोडणारे महाभाग काही कमी नाहीत. ‘पुढचं पाऊल’ या चित्रपटाच्या निमित्तानं, कुटुंबात होणारी घुसमट, कजाग व्यक्तींकडून होणारा छळ निमूट सहन करणारी सून आणि या सुनेच्या मनात एका प्रसंगी आलेली आनंदी, आशादायी किरणांनी न्हालेली, जगण्याविषयीची ऊर्मी जागवणारी भावना सुधीर मोघे यांनी शब्दबद्ध केली. बाबुजी आणि आशाताईंनी या शब्दांना जो न्याय दिला तो केवळ अप्रतिम! बाबुजींसारख्या दिग्गज संगीतकाराच्या स्वरलहरी कवीच्या मनातील शब्दांची वाट शोधत येतात आणि मग जन्माला येतं असं अमरत्व लाभलेलं गीत...

स्वप्नाप्रमाणे भासेल सारे
जातील साऱ्या लयाला व्यथा
भवती सुखाचे स्वर्गीय वारे
नाही उदासी, ना आर्तता
ना बंधने वा नाही गुलामी
भीती अनामी विसरेन मी
हरवेन मी, हरपेन मी
तरीही मला लाभेन मी ।

अहाहा! किती सुंदर लिहिलंय! ‘तरीही मला लाभेन मी.’ हरवायचंय, हरपायचंय; पण पुन्हा स्वत:ला मिळवायचंयसुद्धा! क्या बात है... आत्मशोध सुरू केला तरच काहीतरी स्वत:ला सापडेल ना? चित्रपटातल्या त्या नायिकेला स्वत:ला नवेपणानं सापडल्याचा भास होतो. उद्याच्या आशांनी फुललेल्या मनाचं गूज जाणून घेणारा आशाताईंचा आश्वासक स्वर, प्रत्येक वाढदिवशी, प्रत्येकीला नव्यानं जन्माला घालणारा ठरावा... शोधेल का ती स्वत:च स्वत:ला? आयुष्यात जगणं सुंदर होण्यासाठी नेमकं काय हवंय याची जाणीव तिला होईल का? हे गाणं एकत असतांना घुसमटीचं जिणं जगणाऱ्या समाजातल्या स्त्रिया उगीचच आठवत राहतात. आशेच्या सुंदर हिंदोळ्यावर झुलणारी स्त्री कवी सुधीर मोघे यांनी अतिशय सुरेखपणे रेखाटली आहे. तिची वाटचाल आनंददायी, जीवनाचा अर्थ गवसलेली अशीच असावी असा सकारात्मक विचार नकळत मनात डोकावून जातो. सुधीर मोघे यांचं आशाताईंच्या स्वरातलं हे गीत खूप काही सांगून जाणारं. 

आशा उद्याच्या डोळ्यांत माझ्या
फुलतील कोमेजल्यावाचुनी
माझ्या मनीचे गूज घ्या जाणुनी
या वाहणाऱ्या गाण्यातुनी
लहरेन मी, बहरेन मी
शिशिरातुनी उगवेन मी

सत्याच्या वाटेवरून, सदाचरणाच्या, समंजस भावनेतून तिची वाटचाल होत असताना असा एक क्षण, ज्या क्षणी ती स्वत:ला ओळखते. तिचा स्वत:चा खरा चेहरा पाहताना शिशिरातूनही उगवणाऱ्या पालवीसारखी मोहरते आणि गात राहते... 

पुन्हा नव्याने जन्म घ्यावा...ऐकतच आणि वाचतच राहावी शब्दसुरांनी सजलेली आणि मोहरलेली कविता...

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रातून वरिष्ठ उद्घोषिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत.)

(कविता... स्वरांनी मोहरलेल्या या सदरातील लेखांचे पुस्तक आणि ई-बुक प्रसिद्ध करण्यात आले असून, ते बुकगंगा डॉट कॉमवर उपलब्ध आहे.)




 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UXAXCQ
Similar Posts
घाल घाल पिंगा वाऱ्या... अत्यंत तरल भावकविता लिहिणारे कवी कृ. ब. निकुंब यांचा आज, नऊ ऑगस्ट रोजी जन्मदिन आहे. त्या निमित्ताने, ‘कविता स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज ‘घाल घाल पिंगा वाऱ्या...’ या त्यांनी लिहिलेल्या हृदयस्पर्शी कवितेबद्दल...
मी गाताना गीत तुला लडिवाळा... वास्तवतेचे चटके सोसूनही मन निबर होऊ न देता संवेदनशीलता ज्यांनी जपली त्या कविवर्य ना. धों. महानोरांचा १६ सप्टेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज पाहू ‘एक होता विदूषक’ या चित्रपटातील त्यांच्या ‘मी गाताना गीत तुला लडिवाळा’ या अंगाईबद्दल...
नाच रे मोरा... ‘पुलोत्सवा’चा आनंद ओसरण्याच्या आतच बालदिनाची चाहूल लागते. आजच्या या बालदिनाच्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’मध्ये आस्वाद घेऊ या ‘गदिमां’नी लिहिलेल्या, ‘पुलं’नी स्वरबद्ध केलेल्या नि आशाताईंनी गाऊन चिरस्मरणीय केलेल्या ‘नाच रे मोरा’ या बालगीताचा...
ही वाट दूर जाते... कवयित्री शांता शेळके यांचा जन्मदिन नुकताच (१२ ऑक्टोबर) होऊन गेला. तसेच ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्मदिन २६ ऑक्टोबर रोजी आहे. त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज पाहू या शांताबाईंनी लिहिलेली आणि हृदयनाथ यांनी संगीतबद्ध केलेली ‘ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language